Tuesday, September 4, 2007

ती - पहिल्या प्रेमाची संहिता

आज़ तुझा वाढदिवस. गेली चार वर्षे आज़च्या दिवशी मी तुझ्यापे़क्षाही जास्त आनंदित असायचो. आज़ही आहे. फोनवरून शुभेच्छा देणं, एस एम एस करणं, आणि वर्गात भेटल्यावर पुन्हा शुभेच्छा देणं... वेडेपण वाटायचं सगळं. आज़ फोन करायचा म्हटला, तर नंबर दिलेला नाहीस; मेल केला, तर उत्तर देशील की नाही माहीत नाही. खरंच का एका वर्षात सगळं इतकं बदलून ज़ातं?
आज जेव्हा मी हे सगळं स्वत:शी बोललो, तेव्हा वाटलं, का बरं हा खुळेपणा माझ्याकडून वारंवार होतोय? पण या मुलीने माझ्या आयुष्यावर उमटवलेला ठसाच असा आहे, की तो पुसला ज़ाणं शक्यच नाही; आणि हे मला चांगलंच माहीत आहे. देवाने मला अशा प्रकारे बनवलं आहे, की मनातल्या भावना ज़शा आहेत तशाच आणि पूर्णपणे व्यक्त केल्याशिवाय मला स्वस्थता लाभत नाही. मग त्यावेळी या सगळ्याचा सारखा सारखा विचार करून काय़ मिळणार आहे, काय़ बदलणार आहे, बाज़ूला ढीगभर अभ्यास पडलाय, प्रॉजेक्ट्स पडलीयेत, संशोधन पडलंय त्याचं काय करायचं, असे व्यावहारीक विचार माझ्या डोक्यात येत नाहीत. गंमत म्हणजे मला या व्यवहाराची अपरिहार्यता आणि आत्यंतिक महत्त्व दोन्ही कळतं; पण हे व्यवहार यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारं भावनिक चातुर्य माझ्याकडे आहे की नाही, असा प्रश्न पडून ज़ातो. आणि हिच्यापुढे तर माझं स्वत:चं अस्तित्त्वच मी विसरून ज़ात असे; हे सगळे प्रश्न तर साधे व्यावहारीक प्रश्नच आहेत, बाकी काही नाही.
असं काय आहे हिच्यात ज्यामुळे मी हिच्याकडे आकृष्ट झालो? केवळ गोडगोजिरं रंगरूप, बोलके डोळे नि लोभसवाणं हसू, साधाभोळा मनमिळावू स्वभाव? फक्त इतकंच नाही, तर बरंच काही. ती मला एक माणूस म्हणून आवडते. हिचं केवळ बाह्यरूप किंवा एखादा विशिष्ट गुणविशेष यांच्या प्रेमात मी कधीच नव्हतो. मी प्रेम केलं तिच्या माणूस असण्यावर. तिच्या फक्त गुणांवरच नाही, तर दोषांवरही. अंतर्बाह्य. तिनं मला बदललं. अप्रत्यक्षपणेच. केवळ ती दुखावली जाऊ नये, म्हणून मी माझ्या हट्टी स्वभावात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. संयमात म्हणा किंवा संयमित वागण्यात लक्षणीय वाढ केली. या सगळ्याचा मला माझ्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एकूण फायदाच झाला. माझ्यातल्या कलागुणांची ज़ोपासना व्हायला किंवा सकारात्मक वृद्धी व्हायला तिचं आज़ूबाज़ूला असणं कारणीभूत होतंच. माझ्यातलं संगीत तिच्या श्रवणभक्तीसाठी आणि तिने वाजवलेल्या टाळ्या ऐकण्यासाठी खुलायचं. माझ्यातल्या अभिनेत्याबरोबर तिच्यातल्या अभिनेत्रीची ज़ोडी छानच ज़मायची. तिने माझी चित्रं बघितली नाहीत अज़ून म्हणून! नाहीतर माझ्या चित्रांमध्ये तिचे रंग तिला नक्कीच दिसले असते. मी लिहिलेल्या कवितांमधून सुद्धा शब्द बनून तीच उतरायची. आज़ही माझ्या गझलांमधून ती मला भेटतच असते.
काय आहे इतकं तिच्यात? आपल्या वागण्याबोलण्याने, स्वभावाने, कृतीने आणि केवळ आज़ूबाज़ूला असण्यानेच इतरांना प्रेरित करणारी अजब जादू आहे. योग्य प्रकारे उत्तेजित केल्यावर नि पुरेसा विश्वास निर्माण केल्यावर आपले म्हणणे स्पष्टपणे मांडण्याची हातोटी आहे. चिकित्सक, अभ्यासू वृत्ती आहे. मेहनती स्वभाव आहे. मित्रपरिवाराबरोबर मौज़मजा करण्यात, छान वेळ घालवण्यात तर ती पुढे असतेच, पण जिकडे या सगळ्याला आवर घालून अभ्यास किंवा तत्सम आवश्यक कामं उरकायला पाहिज़ेत, तिकडे त्यानुसार वागण्याचं कसबसुद्धा आहे. सांघिक वृत्ती आहे. पण...
... आत्मविश्वास हवा तितका प्रबळ नाही. इतरांचे वरकरणी साधेसोपे वाटणारे, पटणारे मुद्दे चटकन मान्य करून त्यामुळे प्रभावित होण्याचा काहीसा बुज़रेपणा आहे. तिची काहीशी अशक्त निर्णयक्षमता हा त्याचाच परिणाम असावा. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नाही, असे नाही; ती अधिक सक्षम होणे गरज़ेचे आहे. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. तीही नाही आणि मीही नाही. मात्र ती आयुष्यभरासाठी माझी ज़ोडीदार होणं माझ्या तसेच तिच्या गुणवृद्धीसाठी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने नेहमीच हितावह ठरणार आहे, अशी माझी खात्री होती. आयुष्यभर तिच्याकडून प्रेरणा घेणं आणि तिचा स्वत:पेक्षा जास्त, जिवापाड सांभाळ करणं ही परस्परपूरक उद्दिष्टं आमच्या आनंदी सहजीवनाचं बीजारोपण करतील, अशी भाबडी आशा मला दिसली. माझी तिच्यातली भावनिक गुंतवणूक कदाचित याचंच फलित असावी. रंगवलेली कित्येक स्वप्नं हा त्याचा परिपाक. आणि तिलाच आयुष्यभराच्या ज़ोडीदाराच्या भूमिकेत पाहणं, ही माझ्या प्रेमाची फलश्रुती.
मात्र जितक्या तीव्रतेने मी तिच्यात स्वत:ला गुंतवलं त्याच्याशी मिळत्याज़ुळत्या किंवा त्याहून जास्त तीव्र भावना तिच्या बाज़ूने नव्हत्या, नाहीत. आणि हे तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी स्वत:ला वेळीच सावरण्याच्या खूपच पलीकडे गेल्याची ज़ाणीव झाली. परिणामी आज़ही प्रसंगी मी माझ्या दैनंदिन व्यवहारांपेक्षा तिच्यातच जास्त अडकल्याचा पुसटसा भास होऊन ज़ातो. मला खरं तर ती हे आधीच सांगणार होती; पण अभ्यास, परीक्षा, अभ्यासेतर सांस्कृतिक नि तांत्रिक कार्यक्रम आणि दैनंदिन धबडग्यात हे मोकळेपणाने बोलायचा वेळच नाही मिळाला. एकच गोष्ट चांगली झाली की जे वास्तव आहे ते स्पष्टपणे समोर आल्याने अधिक स्वप्नरंजन करण्यात नि स्वत:ला त्यात गुरफटून घेण्याची वेळच आली नाही. खंत एकाच गोष्टीची वाटते, की हे सगळं तिने मला प्रत्यक्ष भेटून सांगितलं नाही. इकडे येण्यापूर्वी तिला डोळे भरून पाहून घ्यायची नि ती अविस्मरणीय संध्याकाळ कॉफ़ीचे घुटके घेत निवांत घालवण्याची संधी तिने मला का दिली नाही, याचं उत्तर काही सापडत नाही. तिला तिचा नकार स्पष्टपणे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मोकळेपणाने, नि:संकोचपणे मांडता यावा, केवळ म्हणूनच मीही प्रत्यक्ष भेट टाळली. मी खिन्न मनानं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला चाललोय, हे तिच्याने बघवलं नसतं, असं म्हणाली; पण त्यात कितपत तथ्य होतं, की प्रत्यक्षपणे बोलणं तिला अवघड गेलं असतं म्हणून टाळलं?...अनेक अनुत्तरीत प्रश्न. माझं पहिलंच आणि शेवटचं प्रेम आमच्या मैत्रीच्या आड तरी यायला नको, असं मनापासून वाटत होतं; पण मंदावलेला संपर्क, मेलला उत्तर न पाठवणं, बदललेला दूरध्वनी क्रमांक न कळवणं, या सगळ्यातूनही मला माझी उत्तरं शोधता येऊ नयेत, इतका मठ्ठपणा माझ्यात कसा काय आला, याचंच आश्चर्य वाटतं :) ती दुसऱ्या कुणामध्येतरी अडकल्याचं कळल्यावर त्या नशीबवान "दुसऱ्या"बद्दल किंचितसा हेवा वाटला खरा, पण तिचा आनंद ज़र त्यातच आहे, तर माझ्यासाठीही तिच्या आनंदापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट दुसरी नाही. ती सदासर्वदा आनंदी, सुखीसमाधानी राहो, अशी प्रार्थना मी दररोज़च करतो.
आज़ तिचा वाढदिवस. मी पाठवलेलं शुभेच्छापत्र तिला मिळालं की नाही, तिने ते पाहिलं की नाही, माझा मेल तिने वाचला की नाही, काही माहीत नाही. मी आपलं नेहमीसारखं take care and be in touch लिहून मोकळा झालोय :D आणि त्याचबरोबर खुळ्यागत माझ्या वाढदिवसादिवशी तिने मला का म्हणून मेल पाठवला असेल, याचा विचारही करतोय (उगीचंच!)
कितीही काही झालं, तरी शेवटी हे फुलपाखरूसुद्धा माझं स्वत:चंच. जिवापाड ज़पलेलं, त्याच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम केलेलं. अनेक अविस्मरणीय रंग बोटांवर सोडून अलगद उडून गेलेलं. कदाचित पुन्हा न फिरकण्यासाठीच! त्याला पाहिलं, की किशोरकुमारचे शब्द कानात धिंगाणा घालतात -

तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नही
तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन जिंदगी नही
माझ्याच एका गझलेतील काही ओळी यावेळी आठवल्याशिवाय राहत नाहीत -
गर्दीत आठवांच्या झाले उदास जीणे
विसरू कसा तुला मी? थांबेल श्वास घेणे
तू एकदा नव्याने ये ना मिठीत माझ्या
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे

4 Comments:

Anonymous Anonymous said...

khup chan blog ahe

September 4, 2007 at 3:15 AM  
Blogger सोनल देशपांडे said...

:-)

September 17, 2007 at 3:09 AM  
Anonymous Anonymous said...

only thing that i can say is that, THANKS for this post

i dont know whether it is fictional or real in your life..

but it is truth of my life ..
thanks again

September 27, 2007 at 10:15 PM  
Blogger तुमचा मित्र दिनेश said...

छान प्रेमाची संहिता आहे

May 15, 2010 at 5:34 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home